सोलापूरात वृक्षसंहार : बिल्डरसाठी 135 मोठया झाडांची दिवसा ढवळ्या कत्तल, प्लॉटिंगसाठी 5 ट्रक लाकूड विक्रीचा आरोप
सोलापूर, दि. 26 मे: सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सलगरवाडी परिसरात चोपन्न मीटर रोडलगतच्या सुमारे 8 हेक्टर शेतजमिनीतील 30 ते 50 वर्षे वयाची तब्बल 135 ते 150 मोठी झाडे अवैधरित्या तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉटिंगसाठी जागा रिकामी करण्याच्या उद्देशाने गेल्या 10 दिवसांत पिंपळ, जांभूळ, आंबा व बहुतांश लिंब जातीच्या झाडांची कत्तल करून सुमारे 5 ट्रक लाकूड विक्री केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सदर परिसरात माणसांची वर्दळ कमी असल्याने वृक्षतोड लपवून करण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर व वृक्षप्रेमी.राम हुंडारे यांनी त्या ठिकाणी जाऊन लाकूड भरलेली आयशर गाडी (MH 13 CJ 9047) अडवून ठेवत वनविभाग व पोलिसांना पाचारण केले. वनविभागाच्या सौ. शिंदे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक सुरज कोतवाल व महापालिका उद्यान प्रमुख कोमल काशीद यांच्या पथकाने रात्री अंधारात घटनास्थळी पंचनामा सुरू केला.
महापालिका आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही,
मात्र उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी “महानगरपालिकेकडून कठोर कारवाई होईल” असे स्पष्ट केले. उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. “सोलापुरात 44 अंश तापमान आहे. दुपारी 11 नंतर घराबाहेर पडणे मुश्किल आहे. सावली देणारी झाडे तोडणे वेदनादाई आहे. विनापरवानगी झाडे तोडणाऱ्या मालक व कामगारांवर कडक कार्यवाही झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

डॉ. मनोज देवकर म्हणाले, “10 दिवसांपासून 4 ट्रक लाकडे नेली. आज एक पकडला. तापमान वाढत असताना बिल्डरांना माफी नाही. जोपर्यंत छडा लागत नाही तोपर्यंत अधिकारी कार्यालयासमोर व दोषीच्या घरासमोर तीव्र आंदोलन करणार.”
महाराष्ट्रात खाजगी जमिनीतील वड, पिंपळ, आंबा यांसारखी झाडे तोडण्यासाठी वनविभाग, तहसील व महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असते. एका झाडाच्या बदल्यात नवीन झाडे लावणे बंधनकारक आहे. विना परवानगी वृक्षतोडीस दंड व गुन्हा दाखल होतो. सध्या 44 अंश तापमानात सावली देणारी झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप असून दोषींवर पर्यावरण कायद्यानुसार कारवाईची मागणी होत आहे.












1 thought on “सोलापूरात वृक्षसंहार : बिल्डरसाठी 135 मोठया झाडांची दिवसा ढवळ्या कत्तल, प्लॉटिंगसाठी 5 ट्रक लाकूड विक्रीचा आरोप”
That was very dangerous for Solapur all people.
Very sad news.