सोलापूर जिल्हा परिषद एक वर्षात साकारणार ड्रीम प्रोजेक्ट ; पालकमंत्र्यांनी दिले 2 कोटी.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे आपल्या मनावर घेतले आहे.
शिवस्वराज्य दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. त्या दिवशी उपाध्यक्ष पवार यांनी या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री समोर मांडला. यावेळी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी तातडीने एका वर्षात येथे बदल दिसेल अशी ग्वाही दिली आणि तब्बल दोन कोटी रुपये यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून जाहीर केले.
मंगळवारी पत्रकार परिषदेत पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. रंगभवन चौकातील जिल्हा परिषदेच्या या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय दुर्मिळ असा पूर्णाकृती पुतळा आहे. तो साधारण 1960 मध्ये या ठिकाणी उभा करण्यात आला. या उद्यानाच्या बाजूने तीन रस्ते आहेत मात्र हा पुतळा या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसत नाही. दरम्यान आता पालकमंत्री यांनी दिलेल्या दोन कोटी निधीतून या उद्यानाचे रुपडे बदलणार आहे. आजूबाजूला जाणाऱ्या रस्त्यावरून हा पुतळा दिसावा यासाठी उद्यानातील वृक्ष न तोडता त्या वृक्षांना तसा आकार देण्यात येणार आहे. एका वर्षात हे काम करण्यात येणार आहे. पुढील शिवस्वराज्य दिनी या उद्यानात प्रचंड बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.









