सोलापूर जिल्हा सरकारी वकीलपदी मोठा बदल – ऍड. आनंद कुर्डूकर यांच्याकडे धुरा !
*सोलापूर, दि. 14 -* सोलापूर जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सहाय्यक सरकारी वकील म्हणून गाजलेले जेष्ठ विधिज्ञ *ऍड. आनंद कुर्डूकर* यांची *नूतन जिल्हा सरकारी वकील (District Government Pleader)* म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची अधिसूचना आज महाराष्ट्र शासनाने जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार, विद्यमान जिल्हा सरकारी वकील *प्रदीप रजपूत यांची सेवा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात आली* असल्याचे शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
*कोण आहेत ऍड. आनंद कुर्डूकर?*
सन 1985 पासून वकिली व्यवसायात असलेले कुर्डूकर हे गेली 20 वर्षे सोलापूर जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे, आजपर्यंत *351 अट्टल गुन्हेगारांना सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करून जन्मठेपेची शिक्षा* मिळवून दिली आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत शासनाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
*वकीलवर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव*
या नियुक्तीनंतर सोलापूर वकील संघात आनंदाचे वातावरण आहे. माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, ज्येष्ठ विधिज्ञ उमेश मराठे, ऍड. शांतवीर महिंद्रकर यांच्यासह सर्व वकीलवर्गाने कुर्डूकर यांचे अभिनंदन केले आहे. सोलापूरला एक कडक, अभ्यासू आणि न्यायप्रिय सरकारी वकील मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
—








