भाजपाचे नगरसेवक मधुसूदन जंगम यांचे निधन; सोलापूरच्या राजकीय वर्तुळात शोककळा.

वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास; जंगम परिवाराला सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून वारसा.
सोलापूर :प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जांबमुनी मोची समाजाचे मधुसूदन जंगम यांचे गुरुवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वळसंगकर हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मधुसूदन जंगम हे जुळे सोलापूर येथील कुमठेकर हॉस्पिटल परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, डॉक्टर असलेली एक मुलगी, दोन भाऊ तसेच नातलग असा मोठा परिवार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम यांचे ते आजेसासरे होत.
लष्कर परिसरातील जंगम परिवाराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच गेल्या 70 ते 80 वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. या परिवारातून अनेक कुस्तीपटू आणि कबड्डीपटू घडले आहेत. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी जोडलेल्या या परिवारातील मधुसूदन जंगम यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज (शुक्रवारी) दुपारी ४ वाजता कुमठेकर हॉस्पिटलशेजारील त्यांच्या राहत्या घरापासून, जुळे सोलापूर येथून निघणार आहे. मोदी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजप युवा नेते हरीष जंगम यांनी दिली.








