बी-टू मिळकतींच्या मालकी हक्क प्रक्रियेला वेग; उद्या छत्रपती रंगभवन येथे विशेष शिबिर
सोलापूर (प्रतिनिधी). दि. 31 :- सोलापूर शहरातील बी-टू वर्गातील ‘फ्री होल्ड’ मिळकतींना मालकी हक्क देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी (दि. २९ जुलै) विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती रंगभवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार असून, संबंधित मिळकतधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे.

राज्य शासनाने बी-टू वर्गातील ८५२ ‘फ्री होल्ड’ मिळकतींना भोगवटादार वर्ग-२चा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नागरिकांची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या उद्देशाने उत्तर तहसीलदार कार्यालयामार्फत हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूरमधील बी-टू मिळकतींचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्याची घोषणा केल्यानंतर राज्य शासनाने त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली असून, या शिबिरातून मालकी हक्क प्रक्रियेला अधिक वेग मिळणार आहे.
शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे
- जमीन शर्तभंग नसल्यास तीन महिन्यांतील सिटी सर्व्हे उतारा.
- शर्तभंग झाल्यास सिटी सर्व्हे उतारा, खरेदी-विक्री दस्त, गहाणखताची प्रत (असल्यास) आणि घोषणापत्र.
- अपार्टमेंट असल्यास संबंधित घोषणापत्र.
- निवासी किंवा व्यावसायिक वापराचा पुरावा.
- सन १९६९ चे मूल्यांकन दाखला (लागू असल्यास).
मिळकतधारकांनी कोणताही विलंब टाळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत व या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे तसेच जिल्हा प्रशासनाने केले आहे.









