- सोलापुरात १०१ GVP ठिकाणे आढळली; कंत्राटदाराला ₹१ लाख १ हजारांचा दंड
स्वच्छता कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन आरोग्य निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे कठोर निर्देश; GVP ठिकाणे कायमस्वरूपी हटविण्यासाठी दररोज पाहणी
सोलापूर, दि. २९ सप्टेंबर २०२६ : सोलापूर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील १०१ Garbage Vulnerable Point (GVP) ठिकाणी कचरा साचल्याचे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदारावर तब्बल ₹१ लाख १ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता कामकाजावर आवश्यक देखरेख न ठेवणे, GVP ठिकाणांवरील कचरा वेळेत हटविण्याबाबत कार्यवाही न करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन आरोग्य निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. शहरातील GVP ठिकाणे केवळ तात्पुरती स्वच्छ न करता त्यांचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी दररोज पाहणी, जबाबदारी निश्चिती तसेच आवश्यकतेनुसार दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१०१ GVP ठिकाणांसाठी कंत्राटदाराला ₹१,०१,००० दंड
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त माहिती व GVP ठिकाणांच्या छायाचित्रांची तपासणी केली असता शहरात १०१ GVP ठिकाणे आढळून आली. संबंधित कंत्राटातील Annexure-1 नुसार प्रत्येक GVP ठिकाणासाठी ₹१,००० दंडाची तरतूद आहे.
त्यानुसार :
१०१ GVP × ₹१,००० = ₹१,०१,०००
इतका दंड संबंधित कंत्राटदारावर आकारण्यात आला असून, हा दंड सप्टेंबर २०२६ महिन्याच्या देयकातून वसूल करण्यात येणार आहे.
घरगुती, व्यावसायिक आस्थापना, मंडई तसेच सार्वजनिक ठिकाणांहून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमित संकलन व वाहतूक करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. त्यासाठी महापालिकेची रिफ्युज कॉम्पॅक्टर, हुकलोडर, ट्रान्सफर स्टेशनमधील वाहने तसेच आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
GVP ठिकाणे कायमस्वरूपी हटविण्याचे निर्देश
शहरातील GVP ठिकाणी साचलेला कचरा केवळ उचलणे हा कायमस्वरूपी उपाय नसून, त्या ठिकाणी पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
विशेषतः विभागीय कार्यालय क्रमांक ३, ४, ७ व ८ यांच्या कार्यक्षेत्रातील GVP ठिकाणांची दररोज पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
एखाद्या ठिकाणी वारंवार GVP निर्माण होत असल्यास त्याची कारणे शोधून संबंधित कर्मचारी, पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन आरोग्य निरीक्षक निलंबित
स्वच्छता कामकाजात निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी धनकचरा व्यवस्थापन विभागातील आरोग्य निरीक्षक श्री. पांडुरंग कंदी आणि श्री. जितेंद्र मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता कामकाजावर आवश्यक देखरेख व नियंत्रण न ठेवणे, कचरा संकलनाची प्रभावी अंमलबजावणी न करणे तसेच निर्माण झालेल्या GVP ठिकाणांवरील कचरा वेळेत हटविण्याची कार्यवाही न करणे, असा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.
आयुक्तांच्या प्रत्यक्ष पाहणीत स्वच्छतेतील त्रुटी निदर्शनास
दि. २९ सप्टेंबर रोजी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी विभागीय कार्यालय क्रमांक ८ अंतर्गत प्रभागातील स्वच्छता कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान काही भागात कचरा साचलेला आढळून आला. तसेच काही GVP ठिकाणी वेळेत कचरा उचलला गेला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
आरोग्य निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता कामकाजाची नियमित पाहणी करणे, संबंधित कर्मचाऱ्यांकडून कामकाज करून घेणे, कचरा संकलन प्रभावीपणे राबविणे आणि GVP निर्माण होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. या जबाबदाऱ्यांमध्ये कसूर झाल्याने प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार निलंबन
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील संबंधित तरतुदींनुसार आपल्या अधिकाराचा वापर करून श्री. पांडुरंग कंदी व श्री. जितेंद्र मोरे यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
निलंबन कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच नियमानुसार निलंबन निर्वाह भत्ता देण्याबाबत आदेशात तरतूद करण्यात आली आहे.
GVP निर्मूलनासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित
GVP ठिकाणांच्या निर्मूलनाच्या मोहिमेच्या देखरेखीची जबाबदारी सहायक अभियंता इरशाद जरतार, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार आणि कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तसेच संबंधित SI/CSI स्तरावरही प्रत्येक GVP बाबत जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणी वारंवार GVP निर्माण होत असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आर्थिक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे अनेक ठिकाणी GVP निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता महापालिकेच्या घंटागाडीतच कचरा द्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक कचरा टाकणाऱ्या नागरिकांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वच्छता कामकाजातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा संकलन, वाहतूक आणि GVP निर्मूलनाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.
कंत्राटदाराच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्यात येणार असून, करारातील अटींचे उल्लंघन किंवा कामात निष्काळजीपणा आढळल्यास पुढेही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या नाहीत तर नियमानुसार प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.
“GVP मुक्त सोलापूर” करण्यासाठी नियमित पाहणी, जबाबदारी निश्चिती आणि कठोर कारवाईची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार असून, शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









