पिस्तुलचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारी टोळी जेरबंद; फौजदार चावडी पोलिसांची दमदार कामगिरी.
सोलापूर : एमआयटी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा फौजदार चावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी आयान डोनगावकर व त्याचे ४ मित्र एमआयटी कॉलेजजवळ थांबले असताना अॅक्सेस दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवून ३,५०० रुपये हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठांनी डीबी पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पुणे येथील चाफेकर चौकातून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत त्याने साथीदारांची माहिती दिली. त्यानंतर बाळे ब्रिज येथून प्रज्वल गवळी व दुसऱ्या बालकाला अटक करून त्यांच्याकडून १ गावठी पिस्तुल, ४ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली अॅक्सेस दुचाकी हस्तगत करण्यात आली.
आरोपी प्रज्वल वित्तेश गवळी (१९, रा. बुधवार पेठ) सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास पो.नि. विकास देशमुख करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ अरुण देवकर, वरि. पो. नि. महादेव राऊत, पो. नि. विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सपोनि संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार अजय चव्हाण, महेश शिंदे, कृष्णात बहुरे, विनोद पुजारी, दत्तात्रय कोळवले, विनायक जाधव, रवि धेंडे, विनोद व्हटकर, बसवराज परीट, सुरज सोनवलकर, पंकज घाडगे, कुमार शेळके, शशिकांत दराडे, नितीन मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, तौसीफ शेख, अतिश पाटील, सचिन बाबर, आयाज बागलकोटे यांनी केली आहे.









