दरवर्षी 50 लाख निधी देण्याचा प्रस्ताव, चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा उत्साहात संपन्न
सोलापूर, दि. २९ (प्रतिनिधी):
हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या चौथी महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी या स्पर्धेसाठी 25 लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. तसेच पुढील वर्षापासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी दरवर्षी 50 लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, नगरसेविका रोहिणी तडवळकर, सुधा मोरे, अक्कलकोट अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, स्वाती साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा महिला कुस्ती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच त्यांनी गीता आणि बबीता फौगाट यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील महिला खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे, असा विश्वास व्यक्त केला.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांनी हिंदकेसरी किताब पटकावत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले.










