Edition

पद्मशाली समाजाच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी ‘पद्मशाली ॲप’चे हैदराबाद येथे लोकार्पण.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पद्मशाली समाजाच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी ‘पद्मशाली ॲप’चे हैदराबाद येथे लोकार्पण.

 

श्रीनिवास संगा व महेश जिंदम यांच्या संकल्पनेचे मान्यवरांकडून कौतुक; देशभरातील समाजबांधवांना एका डिजिटल व्यासपीठावर जोडण्याचा संकल्प.

 

 

सोलापूर, (प्रतिनिधी) दि. २७ : बदलत्या डिजिटल युगात पद्मशाली समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आणून समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने अखिल भारत पद्मशाली युवजन संगमच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या ‘पद्मशाली ॲप’चे गुरुवारी हैदराबाद येथे लोकार्पण करण्यात आले. सोलापूरचे पद्मशाली समाजबांधव असलेले अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास किशोर संगा आणि जनरल सेक्रेटरी महेश जिंदम यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम साकारला आहे. ‘एक ॲप, एक समाज, एकजूट, डिजिटल सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित हे ॲप केवळ माहिती देणारे माध्यम नसून देशभरातील पद्मशाली समाजबांधवांना परस्परांशी जोडणारे व्यापक डिजिटल व्यासपीठ आहे. युवक, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, कुटुंबे व सामाजिक संस्थांना जोडण्यासोबतच समाजातील कौशल्ये, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता व रोजगाराच्या संधी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ॲपमध्ये गोत्रावळी, समाजाच्या बातम्या व घडामोडी, सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांची माहिती, बिझनेस डायरेक्टरी, नोकरीच्या संधी, शिष्यवृत्ती व शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे. तसेच उल्लेखनीय व्यक्तींच्या कार्याची माहिती देणारे अँचिव्हमेंट्स, फोटो गॅलरी, गीते व व्हिडिओ, विविध समित्या व धर्मशाळांची माहिती, विवाहासाठी मॅट्रिमनी, आर्थिक नियोजनासाठी मनी मॅनेजमेंट, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती आणि युवकांसाठी गुड थॉट्स अशा सुविधांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीनिवास किशोर संगा आणि महेश जिंदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजाच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी आणि देशभरातील पद्मशाली समाजबांधवांना एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच समाजासाठी मोठे योगदान असून, त्यांच्या या प्रयत्नाला व्यापक यश मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. हैदराबाद येथे पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्यास अखिल भारत पद्मशाली संगमचे खजिनदार कोक्कुला देवेंद्र, सचिव चिल्वेरु पुरुषोत्तम, एस.जी. तिलक, महिला विभागाच्या अध्यक्षा वनम धुष्यंताला, महासचिव सुनिता चिल्वेरू, सचिव कृष्णा संतोषी, टीपीपीएस महिला विभागाच्या अध्यक्षा रूपा गुंटका, रामदास यादगिरी, गुर्रम श्रवण, ग्रेटर हैदराबाद योजना अध्यक्ष कल्याण चिन्नी राकेश यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ‘ॲप आपले… समाज आपला… प्रगतीही आपली!’ या भावनेतून प्रत्येक समाजबांधवाने ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. समाजाच्या डिजिटल वाटचालीतील हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, शिक्षण, रोजगार, व्यवसाय, विवाह, आर्थिक मार्गदर्शन, शासकीय योजना आणि सामाजिक संपर्काच्या माध्यमातून पद्मशाली समाजाच्या एकजुटीला नवी दिशा मिळणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!